वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत डोर्ली गावात एका विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 4 डिसे. रोजी उघडकीस आली. संदीप शालिकराम परचाके (27) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. आईवडील शेतात जाऊन असल्याची संधी साधून संदीपने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले.
शिरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक संदीप हा विवाहित असून तिला एक मुलगी आहे. दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे काही महिन्यापासून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी राहत आहे. सोमवारी संदीपचे आईवडील शेतात गेल्यावर तो घरी एकटाच होता. दुपारी 4 वाजता दरम्यान आईवडील शेतातून घरी आले तेव्हा संदीप हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेबाबत शिरपूर पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह खाली उतरवला. मंगळवारी सकाळी वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियाचे स्वाधीन करण्यात आले.