वणी : शासकीय काम आटोपून परत शिरपूरकडे जाताना पोलीस कर्मचाऱ्याच्या ज्युपिटर मोपेडला समोरून येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. विनोद मोतेराव असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा नाव आहे. या अपघातात विनोदच्या जबड्याला व चेहऱ्याला जबर मार लागली असून त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनोद मोतेराव हा सीसीटीएनएस डाटा एन्ट्री कामाकरिता वणी येथे आला होता. काम आटोपून आपल्या ज्युपिटर दुचाकीने रात्री 8 वाजता दरम्यान परत शिरपूरला जात असताना शासकीय औधोगिक प्रशिक्षण केंद्र जवळ समोरून येणाऱ्या एका मोटारसायकलने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस कर्मचारी विनोद मोतेराव व धडक देणाऱ्या मोटारसायकलचा चालक दोन्ही जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांना तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र विनोद मोतेराव यांच्या जबड्याला फ्रेक्चर व चेहऱ्याला गंभीर मार असल्यामुळे त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथे पाठविण्यात आले. यवतमाळ येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहित ठाणेदार संजय राठोड यांनी दिली आहे.
पोलिसांनाही हेल्मेटची अलर्जी ?
दुचाकी अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू किंवा गंभीर इजा होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना हेल्मेट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र सदर घटनेवरून सर्व साधारण नागरिकांप्रमाणे पोलिसांना ही हेल्मेटची अलर्जी असल्याचे चित्र पुढे आले आहे. रात्रीच्या वेळी दुचाकी चालविताना जर पोलीस कर्मचारी विनोद मोतेराव यांनी हेल्मेट लावला असता तर चेहऱ्याला गंभीर इजा पासून त्यांच्या बचाव झाला असता.