वणी टाईम्स न्युज : वृद्ध वडील आपल्या नावाने असलेली शेती पुतण्याच्या नावाने करतील, या भीतीपोटी चौघांनी महिला व तिच्या 14 वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सुकनेगाव येथे घडली. फिर्यादी महिलेनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी प्रतिभा बंडू बोढाले रा. सुकनेगाव ता. वणी हिने दिलेल्या तक्रारीनुसार ती आपल्या कुटुंबासह नमूद पत्यावर राहत असून तिचे सासरे महादेव हरबाजी बोढाले (84) त्यांच्यासोबत राहतात. सासरे वयोवृद्ध असल्याने तिचा मुलगा अमर हा त्यांची सेवा सुश्रुषा करीत असतो. फिर्यादीचे घराशेजारी तिचे दिर राजू बोढाले याचा घर आहे. मोठया भावाकडे वास्तव्यास असलेले वडील त्यांची शेती पुतण्याच्या नावाने करतील, या आशंकेने दोन्ही कुटुंबात वाद सुरू आहे.
दिनांक 14 मे रोजी गैरअर्जदार राजू बोढाले त्याची पत्नी सुषमा बोढाले, नणंद माया बबन वैदय व ननदेचा मुलगा नितेश वैदय यांनी फिर्यादीचे घरासमोर येऊन शिवीगाळ करुन फिर्यादी व तिच्या मुलाला व मुलीला थापडा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच वडिलांची शेती हडपण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पाहून घेईल, अशी धमकी दिल्याची तक्रार अर्जदार प्रतिभा बोढाले यांनी दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी गैरअर्जदार राजू महादेव बोढाले (36), सुषमा राजू बोढाले (30) दोघ रा. सुकनेगाव, ता. वणी, माया बबन वैदय (40), नितेश बबन वैदय (24) रा. कोरंबी (मारेगाव) ता. वणी विरुद्ध कलम 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.