वणी टाईम्स न्युज: येथील भाजीमंडीमध्ये भाजीपाला खरेदी करताना शर्टच्या वरच्या खिशात असलेले 2 मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केले. मोबाईल चोरी गेल्याबाबत फिर्यादी नासीर हारून चिनी (62) रा. साई नगरी वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी हे व्यावसायिक असून दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजता दरम्यान येथील नगर परिषद समोर भाजीमंडी मध्ये भाजीपाला खरेदी करायला गेले होते. भाजीमंडी मध्ये गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेले Vivo V20 Pro किंमत 13 हजार आणि Google Pixel 7A किंमत 27 हजार असे दोन्ही मोबाईल चोरून नेले. घटनेबाबत फिर्यादी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
लग्नसराईची गर्दी आणि चोरट्यांचा चांगभलं
सद्या लग्नसराईचा सीजन असून बस स्थानक, मंगल कार्यालय, बाजारात चांगली गर्दी आहे. नेमकं याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल, पर्स, दागिन्यांवर हात साफ करीत आहे. विशेष म्हणजे चोरट्यांच्या टोळीमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असून बसमध्ये चढताना, भाजीपाला घेताना गर्दीच्या आड त्या प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारल्याची अनेक घटना घडत आहेत.