वणी टाईम्स न्युज : वणी येथील सहारा पार्क मध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी घरफोडीच्या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया (29) आणि पंकज श्रावण खोकरे (31) दोन्ही रा. हुडकेश्वर जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हे सराईत चोरटे असून पोलिसांनी आकाशला नागपूर कारागृहातून तर आरोपी पंकज याला भंडारा जिल्हा कारागृहातून प्रोडयुस वॉरंटवर ताबा घेऊन शुक्रवारी वणीत आणले.
आरोपीने सहारा पार्क येथून चोरी केलेलं सोन्याचे दागिने नागपूर येथील सोनाराकडे ठेवल्याची कबुली दिली. कबुलीवरुन पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन नागपूर येथील मानेवाडा परिसरात स्थित सराफा दुकानात जाऊन 34.820 ग्राम सोन्याची लगड किंमत 2 लाख 38 हजार रु. जप्त केली.
येथील सहारा पार्क मधील शंकर किसन घुगुल व त्यांची पत्नी घर बंद करून ड्युटीवर गेले असता अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून कपाटातील 4 तोळ्याची सोन्याची पोत, कानातले रिंग व 5 हजार रोख असे एकूण 1 लाख 73 हजाराचा ऐवज लंपास केला होता. घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज व नागपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून नागपूर व भंडारा जेलमधून दोघांना ताब्यात घेतले.