वणी टाइम्स न्युज : वणी यवतमाळ मार्गावर 28 एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार हत्याकांडाच्या सहाव्या दिवशीही पोलिसांचे हात रिकामे आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्यासह शिरपूर, मुकुटबन, मारेगाव येथील पोलीस अधिकारी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मदत करीत आहे. मात्र वृद्ध चौकीदाराचा खून करणारे मारेकरी अद्याप पोलीस तावडीतून बाहेर आहे. घटनेच्या मागे संभाव्य सर्व अँगलतून पोलीस तपास करीत आहे.
वणी यवतमाळ मार्गावर पळसोनी फाटा जवळ योगेश ट्रेडर्स यांचे स्टील आणि सिमेंटचा गोडावून आहे. या गोडावूनवर जीवन झाडे (60) हा वृद्ध रखवालदार म्हणून कामावर होता. 28 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या बाहेर खाटेवर झोपलेल्या जीवन झाडेच्या डोक्यावर व पाठीवर वजनी वस्तुने प्रहार करुन त्याचा खून केला. त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी रॉडचे 4 बंडल चोरुन नेल्याची घटना 29 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली होती. घटनेबाबत योगेश ट्रेडर्सचे मालक सुरेश खिंवसरा यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच वणी येथील उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानीसह अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, डॉग स्कवाड, फिंगरप्रिंट तज्ञ यांनी घटनास्थळचा बारकाईने निरीक्षण केला. दरम्यान चोरट्यांनी गोडाऊनच्या बाहेर लागलेले सीसीटिव्ही कॅमरे तोडल्याचे व केबल कापल्याचे दिसून पडले. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी गोडाऊनमध्ये असलेला सीसीटिव्हीचा डिव्हीआर ताब्यात घेतला. परंतु त्या दिवशी दुपारी पासून गोडावून मधील कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग बंद असल्याचे आढळले. त्यामुळे तपासात अडचण येत असल्याचे सांगण्यात येते.
हत्याकांडाची चौकशीच्या दरम्यान चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी चौकीदाराची हत्या केली की, इतर काही कारणांनी हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांनी चोरीचा बनाव केला ? हा यक्षप्रश्न पोलिसांसमोर उभा झाला आहे. मारेकरी संख्येत किती होते ? कोणत्या वाहनाने आले ? कोणत्या मार्गाने गेले ? फक्त चोरी करायची होती तर चौकीदाराला जीवे मारण्याचे कारण काय ? हत्येमागे काही कौटुंबिक व संपत्तीचा वाद आहे का ? मृतक चौकीदार याचा कोणासोबत वाद झाला होता का ? असे अनेक अँगल समोर ठेवून पोलीस तपास करीत आहे.
चौकीदार खून प्रकरणाची चौकशी युद्ध पातळीवर रात्रंदिवस सुरू असताना पोलीस अद्याप अंधारात हातपाय मारत असल्याची माहिती आहे. चौकशी अधिकाऱ्यांना मागील 5 दिवसात एकही असा क्लू मिळाला नाही ज्याला धरून पोलीस आरोपी पर्यंत पोहचू शकेल. शिवाय वणी व यवतमाळ महामार्गावर ठिकठिकाणी लागलेले सीसीटिव्हीचे फुटेजची तपासणी पोलीस करीत आहे.