वणी टाइम्स न्युज :
बेलोरा फाटा येथे मटका जुगार पकडला
शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत बेलोरा फाटा येथे अवैधरित्या वरली मटका जुगार सुरु असल्याची माहितीवरुन शिरपूर पोलिसांनी धाड टाकून आरोपी सुधाकर बानय्या अट्टेला (52) रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर यास अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व रोख 2100 रुपये जप्त केले.
चिखलगाव येथे अवैधरित्या दारू विक्री, डायल 112 वर तक्रार
शहरालगत चिखलगाव येथे वणी यवतमाळ मार्गावर देशप्रेमी हॉटेल समोर अवैधरीत्या देशी दारुची विक्री होत असल्याची डायल 112 वर आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी धाड टाकून 70 नग देशी दारूचे क्वार्टर किंमत 2450 रु. जप्त केली. पोलिसांनी धाड पडताच आरोपी गुड्डू शेख रा. एकता नगर वणी हा फरार झाला. आरोपीविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
सालाना उर्स पाहून पिता पुत्र परत चंद्रपूर येथे जात असताना कार चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला ठोस मारली. वणी वरोरा मार्गावर संविधान चौक येथे गुरुवार 2 मे रोजी सकाळी 10 वाजता घडलेल्या या अपघातात दुचाकी चालक जावेद शेख रा. भिवापूर वार्ड चंद्रपूर याच्या तोंडाला व पायाला गंभीर दुखापत झाली. फिर्यादी अब्दुल मुजिम शेख रोशन रा. भिवापूर वार्ड चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी कार क्रमांक MH01 BU0122 च्या चालकाविरुद्ध कलम 279, 337 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.
लोखंडी कड्याने फोडले डोकं
पाटण पोलीस ठाणे अंतर्गत शिबला येथे एकाने हातातील लोखंडी कड्यांने वार करुन युवकाचे डोकं फोडले. तसेच परत दिसला तर जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. फिर्यादी स्वप्नील सुनील रामटेके (22) रा. इंदिरानगर पांढरकवडा यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सूरज महादेव कन्नाके (25) रा. शिबला, ता. झरीजामणी विरुध्द कलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कट का मारला ? विचारले म्हणून चौघांनी केली बेदम मारहाण
दुचाकीला कट का मारला ? अशी विचारणा केली म्हणून दुसऱ्या दुचाकी चालकांनी मित्रांच्या मदतीने त्याला बेदम मारहाण केली. मारेगाव तालुक्यातील गौराळा फाट्याजवळ ही घटना गुरुवार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. फिर्यादी विलास लक्ष्मण जुमनाके (37) रा. सालेभट्टी, ता. मारेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश कालेकर (25) रा. नेत, ता. मारेगाव व त्याचे इतर 3 साथीदाराविरुद्ध कलम 323, 325, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.