जितेंद्र कोठारी, वणी : आयपीएल क्रिकेट सामन्यात कोलकोता नाईट रायडर्स विरुध्द राजस्थान रॉयल्स टीममध्ये सुरु सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळताना तिघांना एलसीबी पथकाने अटक केली. वागदरा गावाजवळील हनुमान मंदिर परिसरात मंगळवार 16 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. मधुकर पारखी (38) रामपुर वॉर्ड वणी, अरविंद गोहोकर (39) शास्त्रीनगर, वणी व आशिष मेश्राम (22), रामपुर वार्ड वणी असे आरोपीचे नाव आहे.
एल सी बी पथकाने आरोपीकडून 5 मोबाईल फोन, 1 दुचाकी व 4 हजार 800 रुपये रोख असे एकूण 1 लाख 6 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएलच्या 17 व्या सिजनची पहिलीच कार्यवाही .!
क्रिकेट बॅटिंग जुगारात वणीचा नाव राज्यातच नव्हे तर परप्रांतात सुद्धा आघाडीवर आहे. आयपीएल सामन्यात दरम्यान शहरात दररोज लाखोंची उलाढाल होत असते. क्रिकेट बॅटिंगवर जुगार खेळण्यासाठी तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथून शौकीन शहरात येतात. येथील काही कुख्यात बुकीचे थेट परदेशात बसलेल्या बुकी सोबत कनेक्शन असल्याची चर्चा आहे. दोन वर्षापूर्वी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कार्यवाहीनंतर येथील बुकीने ठिकाण बदलविले आहे. आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये एकही कार्यवाही न झाल्याने ‘सब सेट’ असल्याची खमंग चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी आयपीएल रेडचा देखावा तर केला नाही न? अशीही चर्चा आहे.