वणी : शहरातील एका भागात वडिलांसोबत राहणारी अल्पवयीन मुलगी गुरुवार 4 एप्रिल पासुन बेपत्ता आहे. मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे. मागील काळापासून शहरात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील एका शाळेत इयत्ता 8 व्या वर्गात शिकणारी मुलगी आपला वडिलांसोबत राहते. तर तिची आई तिच्या मोठ्या भावासह 2021 पासून राजस्थान येथे राहत आहे. वडील रोजमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दिनांक 4 एप्रिल रोजी वडील कामावर गेले तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. मात्र वडील सायंकाळी 7 वाजता कामावरून परत घरी आले असता मुलगी घरात दिसली नाही.
त्यांनी बाजूला राहणारे आपल्या मोठे भाऊ व आई यांना विचारणा केली असता मुलगी दुपारी 3 वाजता पासून घरात नसल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात मुलीच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे वडिलांनी रात्रीच पोलीस ठाणे गाठून कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञान मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.