वणी : अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून तब्बल 8.50 लाख रुपयांचा सोनं, रोख रक्कम व इतर ऐवज लुटून नेल्याची घटना येथील पटवारी कॉलनीत शुक्रवारी रात्री 2.30 वाजता दरम्यान घडली. लुटारूंनी सोन्याचे दागिन्यांसह रोख 44 हजार व बँकेचे बाँड, विमा पॉलिसी, शाळेच्या उत्तर पुस्तिका, सोन्या चांदीचे बिल तसेच पेंट शर्ट, साड्याही चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी सुभाष वासुदेव पिदुरकर, रा. दीनानाथ नगर, पटवारी कॉलनी, लालगुडा यांनी वणी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
प्राप्त माहितीनुसार वेकोली येथून सेवानिवृत्त सुभाष वासुदेव पिदुरकर यांना 4 मुलगी आहे. 3 मुलीचे लग्न झाले असून एक मुलगी व पत्नीसह ते दीनानाथ नगर येथे राहतात. गुरुवार 4 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता जेवणं करून सर्व जण बेडरूम मध्ये झोपले होते. रात्री 2.30 वाजता दरम्यान बेडरूमच्या दाराला लात मारल्याच्या आवाजावरून पिदुरकर कुटुंबियांना जाग आली. त्यांनी उठून पहिले असता 4 ते 5 इसम हातात चाकू सारखे हत्यार घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले. त्यापैकी एकाने ‘यंहा से हिलना नहीं, नहीं तो मार दूंगा, असे धमकावून फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला.
तर तीन दरोडेखोरांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवून असलेले सोन्याचा मंगळसूत्र, गोप, चपलाकंठी, अंगठ्या, कानातले झुमके असे 169 ग्राम सोन्याचे दागिने तसेच कपाटात ठेवलेले नगद 44 हजारसह बँकेचे बॉन्ड, एलआयसीची दोन पॅालिसी, पोस्टाचे पासबुक, राजूर कॉलरी जि.प. शाळा येतील 6 व 7 व्या वर्गाची 38 उत्तर पुस्तिका, दागिन्याचे बिल व पावत्या तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे कपडे, साड्या असे एकूण 8 लाख 89 हजाराचा मुद्देमाल घेऊन पळून गेले. विशेष म्हणजे दरोडा टाकून पळून जाताना दरोडेखोरांनी पिदुरकर यांना पुलिस मे रिपोर्ट देना नहीं, नहीं तो तेरी लड़की को मार डालेंगे. वो किस रस्ते से जाती है यह हमको मालूम है. अशी धमकीही देऊन गेले.
फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनानुसार सर्व दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असून ते हिंदी भाषेत संवाद करीत होते. फिर्याद वरून वणी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम 395 भाद्वीनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. शहरात चोरीच्या वाढत्या घटनेनंतर दरोड्याची घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.