जितेंद्र कोठारी, वणी : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रपूर हे हॉट सीट बनले असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपने राज्याचे वनमंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार आणि धानोरकर यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते अहिर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान सभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे आपापल्या उमेदवारांसोबत दिसत नाहीत. दोन्ही उमेदवारांसमोर आपापल्या प्रतिस्पर्धी व्यतिरिक्त अंतर्गत गटबाजीवर मात करण्याचे आव्हानामुळे ही निवडणूक अधिकच रंजक बनली आहे.
सध्या काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवार यांची उघड गटबाजी आणि भाजपमधील मुनगंटीवार आणि अहिर यांची अंतर्गत गटबाजी कुणापासून लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत भाजप नेते हंसराज अहीर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपापल्या उमेदवारांसाठी मनापासून काम करतील का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. भाजपने गमावलेली जागा परत मिळवणे तर काँग्रेसने आपली जागा कायम राखणे, ही दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.
पक्षातील वर्चस्व आणि तिकिटासाठी काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात जोरदार लढत झाली. आमदार प्रतिभा धानोरकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेऱ्या गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर धानोरकर यांना तिकीट मिळाले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार धानोरकर यांनी 27 मार्चला नामांकन दाखल करताना आपली ताकद दाखविली. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार धानोरकारांच्या नामांकनसाठी चंद्रपूरला येण्याऐवजी गडचिरोलीला गेले. चंद्रपुरात त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
2019 मध्ये चंद्रपूरची जागा भाजपने गमावल्यानंतर काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अर्धवट राहिले. आता ही जागा 2024 मध्ये कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. 2019 चे भाजपचे उमेदवार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या पराभवाचा वारंवार उल्लेख करून अप्रत्यक्षपणे मुनगंटीवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अहिर पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. मात्र, नाम निर्देशानाच्या वेळी अहिर मुनगंटीवार यांच्यासोबत दिसले. मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मैदानात उतरवले आहे.
काम करणार की वचपा काढणार..!
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला आहे. इतक्या कमी वेळात उमेदवाराला चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 16 विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधण्याचा मोठा आव्हान आहे. शिवाय आपल्या पक्षातील विरोधकांना सोबत घेण्याचे आव्हानही उमेदवारांसमोर असेल. अहिर आणि वडेट्टीवार आपली नाराजी विसरून आपापल्या उमेदवारांसाठी काम करतील की बदला घेणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात तसेच जनतेतही रंगत आहेत.