जितेंद्र कोठारी, वणी :
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी, यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद तर्फे आयोजित महादिप स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून जि. प. वरिष्ठ प्राथ. शाळा ढाकोरी येथील दोन विद्यार्थिनी विमानवारीस पात्र ठरल्या आहेत. कु.दिक्षा मांडवकर आणि कु.कालेश्वरी घोरपडे असे या भाग्यवान मुलींचे नाव आहे. जिल्ह्यातील इतर 50 विद्यार्थ्यांसह दोन्ही विद्यार्थिनी यांनी शुक्रवार 21 मार्च रोजी सायंकाळी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमान तळावरून दिल्लीसाठी झेप घेतली. दिल्ली येथे 5 दिवस शैक्षणिक सहलीनंतर त्या विमानाने परत नागपूर येणार आहे.

नागपूर विमानतळासाठी रवाना होण्यापूर्वी यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते विद्यार्थिनी दिक्षा मांडवकर व कालेश्वरी घोरपडे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांचे कौतुक कऱण्यात आले. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे वणी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर यांनी पात्र विद्यार्थीनीचे कौतुक करुन शैक्षणिक सहलीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका समन्वयक विनोद नासरे यांचाही सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
महादिप परीक्षेत यश मिळवून शाळेचे नाव उंचावल्याबद्दल तसेच विमानवारीस पात्र ठरल्याबद्दल जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. शाळा ढाकोरीचे प्र. मुख्याध्यापक बालाजी बीडगर, विषय शिक्षिका मीनल बेझलवार, स. शिक्षिका माधुरी कावडे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक सहलीला भरभरून शुभेच्छा दिल्या…
काय आहे महादिप परीक्षा ?
स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, स्वयंअध्ययनातून गुणवत्ता विकास व्हावा, सोबतच स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी हे उद्दिष्ट ठेवून यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी महादीप परीक्षेचे आयोजन केले जाते. शालेय अभ्यासक्रम तथा सामान्य ज्ञानाशी सांगड घालणारी महादीप परीक्षेच्या अंतिम फेरीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत विमानवारीसाठी पात्र ठरविल्या जातात. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील 52 विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले आहे. त्यात वणी पंचायत समिती अंतर्गत पात्र दोन्ही विद्यार्थिनी ढाकोरी जि. प. शाळेतील आहे हे विशेष.
सर्व साधारण कुटुंबातील मुलींची गगन भरारी..
दिल्ली विमानवारीसाठी पात्र ठरलेल्या ढाकोरी शाळेतील दोन्ही विद्यार्थिनी दिक्षा मांडवकर आणि कालेश्वरी घोरपडे ह्या सर्व साधारण कुटुंबातील मुली आहे. विमानाला जवळून पाहण्याचे अनेकनाचे स्वप्न असतात. मात्र या दोन्ही मुलींनी आपल्या मेहनत व कौशल्याच्या बळावर कमी वयात विमानात बसून गगन भरारी घेण्याचे स्वप्न साकार केले. त्याबद्दल दोघींचे कौतुक केले जात आहे.










