वणी टाईम्स न्युज: वणी ते नांदेपेरा मार्ग रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसोंदिवस जटिल होत चालली आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाच्या मनमानीमुळे या क्रॉसिंगवर दिवसातून अनेकदा वाहनांची लांबच लांब रांगा लागून वाहतूक जामची समस्या उद्भवत आहे. फाटक उघडण्याच्या प्रतीक्षेत संतप्त वाहन चालकांकडून कोणत्याही दिवशी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वणी शहरातून यवतमाळ व नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नांदेपेरा मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. याच मार्गावर शाळा, महाविद्यालय असल्याने तसेच रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहतुक कोंडीवर आणखी भर पडली आहे. या मार्गाच्या मध्ये रेल्वेच्या दोन फाटक असून प्रवासी आणि कोळसा, सिमेंट वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांचे अप डाउनमुळे दिवसभरात अनेकदा फाटक बंद करण्यात येते. या दरम्यान रेल्वे फाटक्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी, ऑटो, कार, शालेय बस व इतर शेकडो वाहनाची रांगा लागून जातात.

संतापाची बाब म्हणजे रेल्वे गाडी क्रॉसिंग होण्याच्या अर्धा तास पूर्वी फाटक बंद करण्यात येते. तर अनेकदा सिग्नल न मिळाल्याने रेल्वेगाडी अर्धा ते एक तास क्रॉसिंगवरच थांबविण्यात येते. दरम्यान वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिका तसेच शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचण्यात उशीर होतात. फाटक उघडल्यानंतरसुद्धा एकमेकांच्या पुढे जाण्याच्या नादात वाहतूक आणखी खोळंबतात. त्यामुळे नांदेपेरा मार्ग रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक पोलिसांची ड्युटी लावण्याची नागरिकांची मागणी होत आहे.










