वणी टाईम्स न्युज: टिळक चौकात भरदिवसा दगड मारून एका वकिलाच्या थार वाहनाची काच फोडणारा ‘तो’ माथेफिरु युवक पुन्हा शहरातील रस्त्यांवर वावरताना दिसत आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्याला पकडून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसील हद्दीत सोडून दिले. मात्र 2-3 दिवसांनी वरोरा पोलिसांनी त्याला परत वणी येथे आणून सोडून दिले. त्यानंतर मागील 3 दिवसांपासून तो रस्त्यांवर मुक्त संचार करताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

माहितीनुसार सदर माथेफिरु युवक हा यवतमाळ जिल्ह्यातील एक तांडाचा निवासी असून तो आपला नाव सोहम सांगत असते. परंतु त्याच्या आधार कार्डवर गजानन राठोड, रा. बेचखेडा (तांडा) जिल्हा यवतमाळ असे नाव आहे. लहानपणा पासून आईवडिलांची छत्रछाया गमावलेला हा तरुण मोल मजुरी व मिळेल ते काम करीत वयात आला. काही काळापूर्वी तो फिरताना वणीत आला. येथे बारमध्ये वेटरची नोकरी करुन तो उदरनिर्वाह करीत होता.
काही दिवसांपूर्वी त्याच्या वागण्यात फरक पडला होता. त्यामुळे त्याला वेटरची नोकरीतून काढण्यात आले. त्यानंतर सदर युवक देवाला शिवीगाळ तसेच देवाला मारून टाकण्याच्या बडबड करीत मनोरुग्णासारखा शहराच्या रस्त्यावर फिरत आहे. उभी दुचाक्या लात मारुन पाडणे, दुचाकी चालकांवर दगड भिरकावणे, वाहतूक महिला शिपायावर दगड घेऊन मागे धावणे यामुळे त्याची दहशत होती.
मागील 30 ऑगस्ट रोजी या माथेफिरु युवकाने हायकोर्टाच्या एका वकिलाची टिळक चौक येथे उभ्या थार वाहनाची दगड मारून काच फोडली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मनोरुग्णालयात दाखल करण्याऐवजी वरोरा हद्दीत नेऊन सोडले. परंतु दोन तीन दिवसाने वरोरा पोलिसाने त्याला परत वणी येथे आणून सोडून दिल्याची माहिती आहे. या माथेफिरु युवकाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास एखाद्या मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.










