वणी टाईम्स न्युज : शहरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात चिडीमार मुलांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारांकडे वणी पोलिस व दामिनी पथकाचे अक्षम्य दुर्लक्ष सातत्याने दिसून येत असून, संभाव्य अनुचित घटनेचा धोका नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हे टवाळखोर मुलं दिवसभर शहरातील रस्त्यावर व विविध शाळा महाविद्यालय परिसरात एक्टिवा, बाईकवर ट्रिपल सीट बसून भरधाव वेगाने बाईक चालवित असताना पोलिसांच्या नजरेत का येत नाही ?
शाळा सुटण्याच्या वेळेत वरोरा रोड, रवीनगर, एस.बी. लॉन रोड, बीएसएनएल ऑफिस, ब्राह्मणी रोड या भागांमध्ये काही असामाजिक प्रवृत्तीची मुलं ट्रिपल सीटने बाईकवरून भरधाव वेगाने येत मुलींना कट मारतात, सीटी वाजवतात, अश्लील भाषेत बोलतात, हातवारे करतात आणि त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करतात. या मुलींच्या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या कृतीमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथक कार्यरत असून, त्यांचा उद्देश मुलींच्या सुरक्षेकरिता तत्परता दाखवणे हा आहे. मात्र वणी पोलिस ठाण्यांतर्गत दामिनी पथकाची कार्यपद्धती केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. शाळा किंवा कॉलेज परिसरात हे पथक कुठेही गस्त घालताना दिसत नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
दैनंदिन उपद्रवचे ठिकाण.!
या चिडीमार मुलांचा उपद्रव मुख्यतः वरोरा रोड, रवीनगर चौक, बीएसएनएल ऑफिस ते एस.बी. लॉन रोड या परिसरात अधिक जाणवतो. या मार्गांवरून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी घराकडे परततात. याच वेळेस काही टवाळखोर मुलं त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी चाळे करता, मोबाईलने व्हिडीओ काढतात आणि सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे धूम स्टाईलमध्ये बाइक चालवून धोकादायक वातावरण निर्माण करतात.
पालक आणि नागरिकांतून संतापाची लाट
भरस्त्यावर चिडीमारीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थीनींच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण होत आहे. विद्यार्थिनींना शिक्षणाच्या ठिकाणी सुरक्षित वाटू नये, ही बाब अत्यंत खेदजनक असून त्यावर तातडीने कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
राज्यात ‘लव्ह जिहाद’चे वाढते प्रकरण
मागील काही काळापासून राज्यात ‘लव्ह जिहाद’ हा शब्द चर्चेत आला आहे. आपली खरी ओळख लपवून दुसऱ्या धर्माच्या मुलीला प्रेम जाळ्यात अडकून लग्न व नंतर तिचे धर्मांतरण करण्याची अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे वणी पोलिसांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन दामिनी पथक अधिक सक्रिय करण्याची गरज आहे.
प्रशासनाने तातडीने कृती करावी
वणी शहरात दामिनी पथकाचे नियमित गस्त घालणे, सिव्हिल ड्रेसमधील महिला पोलीस नेमणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करणे तसेच टवाळखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे हे उपाय तातडीने राबवण्याची गरज आहे. अन्यथा, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसोबतच समाजात कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे










