वणी टाईम्स न्युज : भारतीय कपास महामंडळ (CCI), नवी मुंबई यांनी कापूस खरेदी प्रक्रियेस अधिक सुलभ व पारदर्शक बनवित आगामी हंगामासाठी “कापूस किसान मोबाईल ॲप” सुरु केले आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी 24×7 उपलब्ध राहणार असून नोंदणी व स्लॉट बुकींग प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना नोंदणी व स्लॉट बुकींगसाठी मदत व्हावी यासाठी सीसीआयने एक विशेष लिंक तयार केली आहे. खालील दिलेल्या या लिंकवर क्लिक करून स्थानिक भाषेत उपलब्ध माहिती व व्हिडिओ पाहता येणार आहे.
👉 अधिकृत YouTube लिंक :
https://www.youtube.com/@KapasKisan-Official
स्लॉट बुकींग प्रक्रिया
● स्लॉट बुकींग सुविधा 7 दिवसांच्या रोलिंग बेसिसवर खुली राहील.
● दररोज एक तारीख बंद, पुढील नवी तारीख खुली होणार आहे.
● उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी राहणार नाही.
● महाराष्ट्र राज्यातील सर्व शाखांमध्ये स्लॉट बुकींगची वेळ दररोज सकाळी 10 वाजता सुरु होईल.
भारतीय कपास महामंडळाने सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, विक्रीसाठी खरेदी केंद्रावर येण्यापूर्वी अनिवार्यपणे स्लॉट बुकींग करूनच येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्वरित मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करून स्लॉट निश्चित करावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, विभागीय कार्यालय वणी यांनी केले आहे.










