वणी टाईम्स न्युज: शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतीच लक्ष्मी नगर येथे स्वर्णलीला शाळेची बस क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन जात असताना रस्त्यात फसली, त्यामुळे या प्रकाराचा पर्दाफाश झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी या गैरप्रकारावर तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक खाजगी शाळा व त्यांच्या बसेस प्रवासी क्षमतेचा फज्जा उडवत विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून वाहतूक करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास तर होतोच, पण अपघाताचा धोका सुद्धा वाढतो. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे इरशाद खान यांनी नमूद केले आहे.
लक्ष्मी नगर येथे अडकलेली स्वर्णलीला शाळेची बस हेच या बेकायदेशीर व्यवस्थेचे जिवंत उदाहरण ठरले. अपुऱ्या देखभालीमुळे बस मध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थी रस्त्यावरच अडकून पडले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा तर झाला,च पण अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले.
इरशाद खान यांनी असा आरोप केला की, “वाहतूक पोलीस आणि शाळा प्रशासन यांच्यातील संगनमतामुळे या बसेसवर कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. पालक अनेकदा तक्रारी करतात, मात्र त्या ऐकून घेण्याऐवजी दुर्लक्ष केले जाते.”
वाहतूक नियमांनुसार, प्रत्येक स्कूल बसची प्रवासी क्षमता ठरवलेली असते, आणि ती मर्यादा ओलांडणे हे कायद्याने गुन्हा आहे. तरीही, काही शाळा व बसचालक मुलांच्या सुरक्षेला धोका पोहोचवत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस व शिक्षण विभागाने अशा शाळा व बसेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खान यांनी केली आहे.
त्यांनी यासाठी केवळ दंड आकारून न थांबता, परवाने रद्द करण्याची कारवाई करावी, असे ठाम मत व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
(वणी टाईम्स न्यूज)










