वणी टाईम्स न्युज: शहरालगत चिखलगाव येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक जागांवर झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्ते, पायवाटा आणि गटारे यावर मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे गावातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
🚫 अतिक्रमणाचे गंभीर परिणाम
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अतिक्रमणांमुळे सार्वजनिक रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच गटारे बंद झाल्याने सांडपाणी साचते, त्यातून दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागांवर अवैध बांधकामे उभी राहिल्याने शासकीय मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
⚠️ ग्रामसेवकांच्या निष्क्रियतेवर आरोप
ग्रामस्थांनी यापूर्वीही ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत चिखलगाव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असे निवेदनात नमूद आहे. “ग्रामसेवकांनी या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून त्यांच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तक्रारींच्या प्रतींसह निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
📜 ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत –
1️⃣ चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अतिक्रमणांचे तात्काळ सर्वेक्षण करावे.
2️⃣ अवैध बांधकामे हटविण्याचे आदेश द्यावेत.
3️⃣ या विषयावर निष्क्रियता दाखवणाऱ्या ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करावी.

या निवेदनावर चिखलगाव येथील रोहन वरारकर, वसंता डवरे, मनोज नवले, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकर, चेतन खापणे, प्रमोद गौरकार, अक्षय दडांजे, प्रशांत मोहुर्ले, कृष्णा अणे, साहिल कुडमेथे, भगवान वाभिटकर, आर्यन ढुमणे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामस्थांच्या या निवेदनावर गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात आणि अतिक्रमणांवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










