सुशील ओझा झरी : झरीजामणी तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीत सचिवाने अधिकाराचा गैरवापर करून तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि प्रशासक नियुक्त होण्यापूर्वीच्या कालावधीत नियमबाह्य आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची तक्रार युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा माजी उपसरपंच चंद्रशेखर बोनगीरवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारीनुसार, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर कोणतीही प्रशासकीय मान्यता, ठराव किंवा अधिकृत परवानगी नसताना सचिवाने ग्रामपंचायतीच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. विविध विकासकामांच्या नावाखाली रक्कम खर्च दाखविण्यात आली असून संबंधित व्यवहारांची माहिती ग्रामस्थांपासून लपविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच खर्चाची कागदपत्रे पाहण्यासाठी मागणी केल्यानंतरही टाळाटाळ केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीत त्या काळात कोणतीही लोकप्रतिनिधी संस्था किंवा प्रशासक अस्तित्वात नसताना सचिवाने स्वतःच्या मनमानीने निधी वापरल्याने शासनाच्या वित्तीय नियमांचे उल्लंघन झाल्याची गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास संबंधित सचिव व व्यवहारात सहभागी व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई करून झालेली आर्थिक हानी वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ही तक्रार गावाच्या हितासाठी आणि सार्वजनिक निधीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे चंद्रशेखर बोनगीरवार यांनी स्पष्ट केले आहे. नियमबाह्य पद्धतीने खर्च करण्यात आलेली संपूर्ण रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











