वणी टाईम्स न्युज: मारेगाव पंचायत समिती अंतर्गत वनोजा देवी येथे मनरेगा अंतर्गत मंजूर सिमेंट काँक्रिट रस्ता चोरीला गेल्याची तक्रार गावातील उप सरपंच यांनीच केल्याने खळबळ उडाली आहे.
वनोजा (देवी) येथील उप सरपंच प्रशांत भंडारी यांनी गट विकास अधिकारी, पं. स. मारेगाव यांना दिलेल्या तक्रारीत म. रो. ह. यो. अंतर्गत प्रवीण धांडे ते अशोक आत्राम यांचे घरापर्यंत 14 लाख 40 हजार रुपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता मागील 15 महिन्यापासून पूर्ण झाला नसून रस्ता चोरी गेल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मागील 15 महिन्यापूर्वी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर ग्राम पंचायतीने नेमलेल्या कंत्राटदारांनी रस्त्यावर 80 mm गिट्टीसुद्धा टाकली. मात्र काही दिवसानंतर उर्वरित काम आणि कंत्राटदार दोन्ही बेपत्ता झाले. रस्त्यावरील पसरलेल्या गिट्टीमुळे नागरिक व जनावरांच्या पायाला जखमा होत आहे. त्यामुळे सदर मार्गाच्या कामाची चौकशी करुन गावकऱ्यांना त्रासापासून मुक्त करावे. तसेच कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी उप सरपंच प्रशांत भंडारी यांनी केली आहे.










