वणी टाईम्स न्युज: राष्ट्रीय विद्यार्थी दिवस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत अभाविप वणी शाखेच्या वतीने “यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर कार्यक्रम” मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गजानन कासावार ,सिनेट सदस्य, अमरावती विद्यापीठ उपस्थित होते. तसेच वणी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पिंपळशेंडे तसेच अभाविप चे विदर्भ प्रांत सहमंत्री अनिकेत दांदडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात वणी शहरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या सत्काराने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच, या कार्यक्रमात अभाविप वणी नगरच्या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रा. वैभव दहेकर यांची नगर अध्यक्ष म्हणून तर कु. आयुषी फुलेवार यांची नगर मंत्री म्हणून निवड झाली.
कार्यक्रमाचे संयोजन प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्ती जागवणारे ठरले. विद्यार्थ्यांमध्ये समाजप्रेम, नेतृत्वगुण आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यांची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने अभाविपचे हे कार्य उल्लेखनीय असल्याचे सर्व मान्यवरांनी सांगितले. या वेळी यवतमाळ विभाग संयोजक नीरज चौधरी, वणी जिल्हा संयोजक चेतन राऊत, जिल्हा संघटनमंत्री वैभव वाघमारे, माजी नगरमंत्री विनय पुराणकर, तसेच अभाविपचे कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










