वणी टाईम्स न्युज : भगवान महावीर जयंती निमित्त गुरुवार 10 एप्रिल रोजी वणी नगर पालिका हद्दीतील सर्व मांस, मटण, मच्छी विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश निर्गमित केले असून आदेशाची सख्त अंमलबजावणी करण्याची मागणी सकल जैन समाज वणी तर्फे शासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
भगवान महावीर यांनी जगाला अहिंसा तसेच जगा आणि जगु द्या हा संदेश दिला आहे. त्याला अनुसरून शासन निर्णयानुसार 10 एप्रिल रोजी वणी शहरातील सर्व मांस मटण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नगर परिषद प्रशासनाने जारी केले आहे. नगर परिषद हद्दीत गुरुवार 10 एप्रिल रोजी दिवस भर कुठेही मांस विक्री दुकाने सुरू राहणार नाही यासाठी पथक नेमण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध नगर परिषद अधिनियम 1965 च्या तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

राज्य शासनाने मांस विक्री बंदीचे आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, याकरिता सकल जैन समाज वणी तर्फे उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन तसेच नगरपरिषद येथे निवेदन देण्यात आले. यावेळी स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रफुल खिंवसरा, तेरापंथी सभाचे अध्यक्ष विजय भंडारी, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष कमलाकर चुंबळे, मंदिरमार्गी समाजाचे प्रमोद कोटेचा, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनुराग काठेड, राजेंद्र खिंवसरा, सुशील मुथा, महेंद्र चिंडालिया, अनिल चिंडालिया, जितेन्द्र कोठारी, धर्मेंद्र भंडारी उपस्थित होते.











