वणी टाईम्स न्यूज : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील प्रभाग रचनेबाबत ग्रामस्थांमध्ये विविध मागण्या समोर येत आहेत. अशातच गट ग्रामपंचायत लाठी (भालर वसाहत) चे सदस्य अॅड. राहुल बापुजी खारकर यांनी तहसीलदार वणी यांच्याकडे एक लेखी निवेदन सादर करून “2025 जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभाग मतदारसंघ” या अंतर्भूत रचनेचे नाव ‘वेल्हाळा’ ऐवजी ‘लाठी’ करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या या प्रभागाचे नाव ‘वेल्हाळा’ देण्यात आले असले तरी वेल्हाळा हे केवळ महसूल शिव आहे. तेथे कोणतेही स्वतंत्र मतदान केंद्र नाही. या शिवमध्ये ग्रामपंचायत, शाळा, शासकीय कार्यालये अथवा सार्वजनिक सेवा संस्था देखील अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या नावाने मतदारसंघ ओळखणे दिशाभूल करणारे असून स्थानिक लोकशाही प्रक्रियेत सहभाग नसलेल्या महसूल शिवाचे नाव देणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
त्याउलट लाठी ही ग्रामपंचायत प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्येची असून येथे शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, वसाहती व अन्य महत्त्वाच्या संस्था आहेत. यामुळे प्रभागात प्रत्यक्ष व प्रभावी भूमिका बजावणारे केंद्र लाठीच असल्याने, या सर्कलचे नाव “लाठी” करणे स्थानिक वास्तवाशी सुसंगत राहील, असे खारकर यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.
यापूर्वी सुद्धा या सर्कलचे नाव “लाठी-लालगुडा” असे होते, अशी माहिती देत त्यांनी ऐतिहासिक संदर्भही दिला आहे. सध्याचे “वेल्हाळा” हे नाव सर्वसामान्य जनतेमध्ये गोंधळ निर्माण करणारे असल्याने ते बदलणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाने गांभीर्याने विचार करून “लाठी” नाव निश्चित करावे, अशी विनंती एड. खारकर यांनी केली आहे. या मागणीला स्थानिक ग्रामस्थांकडूनही जोरदार पाठिंबा मिळत असून लवकरच या मागणीचा सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










