जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगून सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारीसाठी भाऊगर्दी करीत आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपकडून उमेदवारी मिळण्यास सगळ्यात जास्त इच्छुक असल्याचे दिसत आहे.

नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखली आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळणे करिता 11 जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले होते. त्यातून छाननी करून 7 अर्जदारांची मुलाखत पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी घेतली. तर नगरसेवकाच्या 29 जगासाठी तब्बल 135 जणांनी भाजपकडे उमेदवारी साठी अर्ज केल्याची माहिती आहे. योग्य व विनिंग उमेदवार निवडणूक मैदानात उतरविण्यासाठी भाजपने प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र प्रभारी नेमले आहे. तसेच खाजगीरित्या सर्व्हेच्या माध्यमातूनही योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या आठवड्यापासून शहरात उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. माजी नगरसेवक पुन्हा राजकारणात पुनरागमनाची तयारी करत आहेत, तर नव्या पिढीतील तरुण, व्यावसायिक आणि शिक्षित चेहरेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची उत्सुकता दाखवत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक पातळीवरील गणिते आणि शिफारशींचा पाढा पक्षश्रेष्ठींसमोर मांडला जात आहे. काही ठिकाणी अंतर्गत संघर्ष उफाळला असून, नाराज गटाचे सूरही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींना संतुलन राखत उमेदवार निवड करणे हे मोठे आव्हान ठरले आहे.
वणी नगर परिषदेच्या मागील कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वणीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यातून शहरात रस्ते, बगीचे, सांस्कृतिक भवन, पाणी पुरवठा योजना व इतर अनेक प्रलंबित विकास कामे साकार करण्यात आले. यापुढेही शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. असे प्रतिपादन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.










