वणी टाईम्स न्युज : रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी सोमवारी त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनात भाषणही दिले. मात्र मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी मुकुटबन येथे उघडकीस आली. भुमारेड्डी नानाजी येनपोतुलवार (55) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार व्यावसायिक असलेले भुमारेड्डी येनपोतुलवार हे मुकुटबन परिसरात सगळ्यांना परिचित नाव आहे. राजकारण ते समाजकारणात त्यांचा सहभाग व्हायचा. अत्यंत मनमिळाऊ आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले भुमारेड्डी यांनी मागील दोन वर्षापासून रखडलेल्या रस्ता व नालीचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी घेऊन राजराजेश्वर मंदिरासमोर आंदोलनात सहभागी झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी आपले मनोगतही मांडले होते.
रात्री जेवण करून झोपेपर्यंत भुमारेड्डी यांना कोणताही त्रास नव्हता. मात्र पहाटे 4 वाजता दरम्यान त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. उपचारासाठी वणी येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. भुमारेड्डी येनपोतुलवार यांचे मागे पत्नी, दोन मुले व आप्त कुटुंब आहे. त्यांच्या पार्थिव शरीरावर आज मुकुटबन येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.










