वणी टाईम्स न्युज | वणी शहरात JioMart ची घरपोच वस्तू वितरण सेवा सोमवार दि. ६ एप्रिल पासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. डिलिव्हरी बॉय यांना प्रति डिलिव्हरी मिळणाऱ्या कमिशनमध्ये कपात करण्यात आल्याच्या निषेधार्थ तब्बल ७० डिलिव्हरी बॉयनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या अचानक झालेल्या निर्णयामुळे शहरातील हजारो ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

कमिशन कपातीविरोधात आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, जियो मार्टकडून डिलिव्हरी बॉयना दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये अलीकडेच घट करण्यात आली. यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. “इंधन दर वाढलेले असताना आणि खर्च वाढत असताना कमिशन कमी करणे अन्यायकारक आहे,” अशी भूमिका डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. डिलिव्हरी बॉयनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत कमिशन पूर्ववत किंवा समाधानकारक वाढ केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.
ग्राहकांना मोठा फटका
वणी शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक JioMart App च्या माध्यमातून रोजच्या गरजेच्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी करतात. मात्र, सोमवार पासून JioMart ऍपवर ऑर्डर देऊन ही सामानाची डिलिव्हरी होत नसल्याने अखेर ग्राहकांना दुकानांवर जाऊन खरेदी करावी लागत आहे.विशेषतः गृहिणींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, अचानक सेवा बंद झाल्याने नियोजन बिघडल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
स्थानिक बाजारपेठेवर परिणाम
या कामबंद आंदोलनाचा स्थानिक किरकोळ बाजारावरही परिणाम दिसून येत आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते, जियो मार्टची सेवा बंद असल्याने पारंपरिक किराणा दुकानांकडे ग्राहकांचा ओघ वाढला आहे. मात्र, दीर्घकाळ सेवा बंद राहिल्यास संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घरपोच सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी
वणी शहरात जियो मार्टची डिलिव्हरी सेवा बंद राहिल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगारांच्या मागण्या आणि कंपनीची भूमिका यावर पुढील काही दिवसांत तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नागरिकांनी लवकरात लवकर हा वाद मिटवून सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.










