वणी टाईम्स न्युज: कोंबड्यांची झुंजीवर पैसे लावून हारजीतचा खेळ सुरु असताना पोलिसांनी धाड टाकली. वणी पोलिसांनी कुंभारखनी क्वार्टर परिसरातील खुल्या जागेवर केलेल्या या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ₹१,०४,१५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुंभारखनी क्वार्टरच्या मागील जंगलसदृश भागात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी नमूद ठिकाणी काही जण कोंबड्यांच्या पायाला धारदार ब्लेड बांधून झुंज लावताना आढळले. पोलिसांचा छापा पडताच जुगारी सैरभेर होऊन पळून गेले. मात्र 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपी कैलास जगन पेंदोर (३०), धर्मा किसन परचाके (४३), दोघं रा. सुर्ला, ता. झरी-जामनी, उत्तम बोडकाजी ठाकरे (५५) रा. वेगाव, ता. मारेगाव, ऋषभ गजानन खुसपुरे (२८), रा. कोलगाव, ता. मारेगाव, शंकर शामराव वराटे (३२) रा. मारेगाव, ता. वणी, रमेश हिरामन झाडे (४०), रा. गणेशपूर, ता. वणी यांचेकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम : ₹४०,६००/-, झुंजीसाठी वापरलेले ३ कोंबडे (एक जखमी), ४ मोबाईल फोन, 1 दुचाकी तसेच कोंबड्यांच्या पायाला बांधलेल्या लोखंडी धारदार काती असे एकूण ₹१,०४,१५०/- चा मुद्देमाल जप्त केला.
कायदेशीर कारवाई:
जप्त कोंबड्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस स्टेशनमध्ये लिलाव करण्यात आला असून त्यातून ₹८००/- रक्कम प्राप्त झाली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(ब) व १२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










