वणी टाईम्स न्युज: वणी पोलीस स्टेशन हद्दीत विद्यानगरी परिसरात रात्रीच्या गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली करत असलेला एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. सदर तरुण आपले अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने हालचाल केल्याचा संशय असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल निलकमल भोसले व अनिकेत यांच्या गस्तीदरम्यान दिनांक 21 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे 2.30 वाजता विद्यानगरी भागात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्याला चौकशीसाठी थांबवून नाव विचारले असता त्याने आपले नाव आशिष हरीचंद्र बोथले (28), रा. एकरजुना, ता. वरोरा, जि. चंद्रपूर असे सांगितले.
पोलिसांनी रात्री उशिरा फिरण्याचे कारण विचारले असता बोथले याने उडवाउडवीची उत्तरे दिली व समाधानकारक कारण सांगितले नाही. त्याच्याकडे संशयास्पद वस्तू आढळून आली नसली तरी, त्याचे कृत्य हे दखलपात्र गुन्ह्याची तयारी असल्याचे दिसून आले. याप्रकरणी वणी पोलीसांनी बोथले याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी सावधगिरीचे आवाहन केले आहे.










