वणी टाईम्स न्युज – मारेगाव तालुक्यातील एका महिलेने तिच्या शेतात काम करणाऱ्या इसमाविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन वर्षांपूर्वी शेतीच्या कामावरून काढल्यानंतरही तो वारंवार तिचा पाठलाग करत असून, नुकताच रात्रीच्या वेळी तिच्या घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, विजय लक्ष्मण आत्राम (35 ) हा दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात मजुरी करायचा. मात्र, कामावरील वाईट वागणुकीमुळे तिच्या पतीने त्याला कामावरून काढले होते. त्यानंतर तो दोन वर्षांपासून गावात आला नव्हता. परंतु 21 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास विजय आत्राम अचानक तिच्या घरात घुसला. त्यावेळी महिलेने आपल्या पतीला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झोपेतून उठले नाहीत. त्यानंतर तिनं सासू-सासऱ्यांना उठवले, तेव्हा आरोपी विजय घराच्या मागच्या बाजूने पळून गेला.
महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी हा वारंवार त्यांच्या घरामागील शेतातून किंवा खिडकीतून घरात येण्याचा प्रयत्न करतो. तसेच, ‘मी तुझी बदनामी करीन’ आणि ‘जीवे मारून टाकीन’ अशा धमक्याही तो नेहमी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या गंभीर प्रकारामुळे घाबरून तिने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली असून, गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.










