वणी टाईम्स न्युज : वडीलांना कॉलेजला जातो म्हणून घरुन निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी सायंकाळ पर्यंत वाट बघून आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईकांकडे तसेच मित्रपरिवारात शोध घेतला, परंतु तिचा काहीही पत्ता लागला नाही. शेवटी मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठून तिची 16 वर्षाची मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय घेत तक्रार दाखल केली.

फिर्यादी महिला ही आपल्या पती व दोन मुलीसह राहत असून मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. 9 जानेवारी रोजी फिर्यादी मजुरी कामावर गेली असता तिचा पती व दोन्ही मुली घरी होत्या. तिची मोठी मुलगी करिश्मा (बदललेले नाव) 16 वर्षाची असून शहरातील एका महाविद्यालय 11 वीमध्ये शिक्षण घेत आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, करिश्माची झरीजामणी तालुक्यातील अनिष नावाच्या मुलासोबत ओळख असल्याने ती त्याच्यासोबत फोनवर बोलत होती. तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांचे बोलणं बंद केले.
मात्र मुलगी बेपत्ता झाल्यानंतर संशयित युवकाने तिच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन फूस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.










