वणी टाईम्स न्युज : मुलीचे चांगलें शिक्षण व्हावे, या उद्देशाने वडिलांनी तिच्या मामाच्या गावात एका महाविद्यालयात दाखला करुन दिला. मात्र मामाच्या घरी राहण्यासाठी आलेली अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशीच कोणालाही न सांगता बेपत्ता झाली. भाची बेपत्ता झाल्याबाबत सोयऱ्याने फोनवर जावयाला कळविले. दोघांनी मिळून गावात व नातेवाईकांकडे मुलीबाबत विचारणा केली. मात्र मुलगी कुठेही मिळून आली नाही.
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील फिर्यादी वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची 17 वर्ष 7 महिन्याची मुलगी 31 जुलै 2025 रोजी तिच्या मामाच्या घरी गेली होती. दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कॉलेजला जातो, असे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. परंतु सायंकाळ पर्यंत ती घरी परत आली नाही. मामाने तिच्या मोबाईलवर कॉल केला असता मोबाईल स्विच ऑफ होता.
अखेर फिर्यादी वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांच्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्ता विरुद्ध कलम 137(2) अंतर्गत गुन्हा नोंद करुन मुलीचे शोध घेणे सुरू केले आहे.










