वणी टाईम्स न्युज: शहरात दिवसेंदिवस अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हा शाखा पथकाने बुधवारी रात्री टिळक चौक येथे दोन तरुणांकडून प्रतिबंधित MD ड्रग पावडर जप्त केला. आरोपी युवकांकडून 3.37 ग्राम एमडी पावडर, एक रॉयल एनफिल्ड बाईक व दोन मोबाईलसह 3.50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हा शाखा पथकाला टिळक चौक येथे अमली पदार्थांची डील होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने LCB चे काही कर्मचारी साध्या ड्रेसमध्ये पाळत ठेवून होते. रात्री 11 वाजता दरम्यान एका आइस्क्रीम सेंटर व पान टपरीचे मागे MD अमली पदार्थांची डिलिंग सुरू असताना LCB पथकाने झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एका पॉलिथीनच्या पन्नी मध्ये 3.37 ग्राम MD पावडर आढळला.
पोलिस पथकाने सदर प्रकरणी आरोपी युगांत दिनेश दुर्गे (19) राह. शिवाजी चौक, विसापूर, जिल्हा चंद्रपूर ह. मु. पंचशील नगर वणी व शहबाज सत्तार मिर्झा (35) राह. साई नगरी, वणी असे दोघांना अटक करून त्यांचे विरुद्ध 8(क) 21 (A ), 29 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून एक बुलेट बाईक व 2 स्मार्ट फोनसह 3 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्था. गुन्हा शाखा) यांचे मार्गदर्शनात API दत्ता पेंडकर, हेडकॉन्स्टेबल सुनील खंडागळे, हेडकॉन्स्टेबल सुधीर पांडे, PC रजनीकांत मडावी, सलमान शेख, DNPC सतीश फुके सर्व स्था. गुन्हा शाखा पथक यांनी पार पाडली.










