वणी टाईम्स न्युज | वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ पथकाने पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३७३/२०२६ कलम ३०३(२) अन्वये बकरी चोरी प्रकरणातील आरोपी जत्रा मैदानं परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सीताराम आसराम भिसे (वय २४), सुनील रामप्रसाद साळुंखे (वय २७) आणि संजय राजू वायकर (वय २३, सर्व रा. गोकुळ नगर, वणी) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी वणी येथील बकरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सन २०२४ ते २०२६ या कालावधीत वणी शहरासह परिसरात अनेक बकरी चोरीचे गुन्हे केल्याची माहितीही उघड झाली.
चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी सुनील साळुंखे याच्याकडून चोरीतील विक्रीची ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (क्रमांक MH-29-BE-8012) जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत अंदाजे ३ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच आरोपींनी पोलीस ठाणे पांढरकवडा येथील गुन्हा क्रमांक ०३/२०२६ तसेच वडकी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४८६/२०२४ आणि ६६२/२०२४ मधील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. या प्रकरणातील सचिन वायकर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंढकर, पोउनि धनराज हाके, पोहेवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोका सलमान शेख व चालक पोहेवा नरेश राऊत यांनी केली.










