वणी टाईम्स न्युज : शहरालगत वडगाव (ध.) येथील प्लॉट खरेदीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित खरेदीदार यांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही आरोपींविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारदार सूरज रमेश चाटे व संध्या संजय तरवटकर यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर उप विभागीय अधिकारी यांनी संबंधित साजाचे तलाठी यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असा पत्र वणी पोलिसांना दिला आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी फसवणूक करणाऱ्या मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, अर्जनवीस व विक्रेत्यासह चौकशीत दोषी आढळलेले सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहेत.

तक्रारदार संध्या संजय तरवटकर (52) व सुरज रमेश चाटे (29) दोघेही रा. वणी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, जुलै 2024 मध्ये परिचितांच्या माध्यमातून शहरालगत वडगाव (ध.) येथील गट क्र. 15/1-अ मधील प्लॉट क्र. 30 खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. प्लॉट मालक शैलेश दादाजी वाकडे (रा. बाबुपेठ चंद्रपूर), अर्जनवीस सतिष पुंडलीकराव केराम, रा. ओमनगर, चिखलगाव, वडगावचे तलाठी रविंद्र निळकंठ उपरे व मंडळ अधिकारी राजु निळंठराव डोंगरे यांनी एकत्र येत या प्लॉटचे मालकी हक्काचे व फेरफाराचे कागदपत्रे खरी असल्याचे दाखवले.
खरेदी सौदा पक्का झाल्यानंतर तक्रारदारांनी 19 जुलै 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय वणी येथे नोंदणीकृत विक्रीपत्र करून प्लॉट मालक शैलेश दादाजी वाकडे यास 60-60 हजाराचे दोन धनादेश मार्फत एकूण 1 लाख 20 हजार रुपये अदा केले. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांकडून फेरफार नोंदणी व सातबारा उतारा देखील तक्रारदारांच्या नावे निर्गमित करण्यात आला. मात्र, सप्टेंबर 2024 मध्ये स्थानिक रहिवाशांकडून सदर भूखंडाचा मालक शैलेश दादाजी वाकडे नसून प्रत्यक्षात दीपक भट्टाचार्य असल्याचे समजताच तक्रारदारांना फसवणुकीचा संशय आला. पुढील चौकशीत 12 जून 2024 रोजी घेतलेला फेरफार क्रमांक 1539 हा खोटा असल्याचे आणि विक्रीपत्रातील व्यवहार कधीच घडला नसल्याचे स्पष्ट झाले.
भुखंड खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खरेदीदार सूरज रमेश चाटे व संध्या संजय तरवटकर यांनी उप विभागीय अधिकारी वणी तसेच पोलीस स्टेशन वणी येथे तक्रार देऊन फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली. तक्रारदारांच्या मते, आरोपींनी संगनमताने खोटे दस्तऐवज तयार करून शासकीय नोंदीत अफरातफर केली व आर्थिक फसवणूक केली. पैशांची परतफेड करण्याचे आश्वासन देऊनही आजतागायत रक्कम परत न केल्याने तक्रारदारांनी आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्वरित अटक करण्याची मागणीही केली.
मात्र महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्रियस्थ व्यक्तीचा भुखंड खोटे दस्तावेज तयार करून विकणाऱ्या शैलेश दादाजी वाकडे, खोटे कागदपत्रे तयार करणारा अर्जनवीस सतीश पुंडलिक केराम, खोटा 7/12 व फेरफार करणारे ग्राम महसूल अधिकारी रविंद्र निळकंठ उपरे व मंडळ अधिकारी राजु निळंठराव डोंगरे यांच्यावर आजपावेतो कोणतीही कारवाई झाली नाही.
एसडीओची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
सदर फसवणूक प्रकरणी गैरअर्जदार मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना वाचविण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांनी अर्जदारांना कुठलीही माहिती न देता मागील तारीख (Backdate) मध्ये अर्जदाराच्या नावावर केलेले फेरफार रद्द करण्याचे आदेश पारित केले. तसेच फसवणुकीत सहकार्य करणाऱ्या मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करु नये असे पत्र स्थानिक पोलीस स्टेशनला दिले. असे आरोप करुन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांची चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना 28 जुलै 2025 रोजी निवेदन देऊन केली आहे.
अपर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात सुनावणी
सदर प्रकरणी अपिलार्थी सूरज रमेश चाटे व संध्या संजय तरवटकर यांच्या अपिलीवरून 20 ऑगस्ट 2025 रोजी अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान हजर राहून जवाब दाखल करण्यासाठी तलाठी, वडगाव (धंदीर), तालुका वणी, मंडळ अधिकारी, वडगाव (धंदीर), तालुका वणी, भूखंडाचे मूळ मालक मयत दीपक भट्टाचार्य यांचे वारसदार शुभोदीप दीपक भट्टाचार्य व आरोपी शैलेश दादाजी वाकडे, चंद्रपूर यांना नोटीस बजावण्यात आले आहे.
पोलिसांवर दबाव कुणाचा ?
सदर प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आदेश देऊनही वणी पोलीस फसवणूक करणाऱ्या आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल का करत नाही ? पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फिर्यादी यांनी जरी जिल्हाधिकारी यांच्याकडे सिव्हिल अपील दाखल केली असेल, पण त्या अपिलीचा फसवणुकीच्या गुन्ह्याची काय संबंध ? हे न समजणारे कोडे आहे..!










