वणी टाईम्स न्युज : एका तरुणीच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण काही दिवसांतच धक्कादायक वळणावर येऊन ठेपले. लग्न ठरले, साक्षगंधाचा कार्यक्रमही पार पडला, दोन्ही कुटुंबांमध्ये नातेसंबंध जुळले; मात्र लग्नाची तयारी सुरू असतानाच होणारा वर अचानक बेपत्ता झाला. याप्रकरणी वधूपक्षाने सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीसाठी संगनमताने विवाह मोडल्याचा आरोप करत पाच जणांविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मारेगाव तालुक्यातील एका गावातील 26 वर्षीय मुलीचा विवाह कळंब तालुक्यातील मेंढला येथील गजानन गणेश अंबाडेरे याच्याशी ठरला होता. 25 फेब्रुवारी 2026 रोजी गावात साक्षगंधाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. त्यावेळी वर पक्षाकडून कोणतीही आर्थिक अथवा हुंड्याची मागणी करण्यात आली नव्हती.
मात्र साक्षगंधानंतर काही दिवसांनी परिस्थिती बदलल्याचा आरोप आहे. 4 मार्च रोजी वराची बहीण आणि तिचे पती हे वधूपक्षाच्या घरी आले. वर पक्षाचे पाहुणे असल्याने फिर्यादी यांनी त्यांची चांगली सरबराई केली. जेवण वगैरे झाल्यानंतर वराच्या बहिणीने लग्नावेळी मुलीला सोन्याचे दागिने द्यावेत, असा आग्रह धरला. मात्र आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अशी मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे मुलीच्या वडिलांनी स्पष्ट केले.
या भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. 14 मार्च रोजी भावी वर गजानन अंबाडेरे हा चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती वधूपक्षाला देण्यात आली. ही बातमी ऐकून वधूपक्ष हादरला. दुसऱ्याच दिवशी संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आणि 16 मार्च रोजी मेंढला येथे दोन्ही बाजूंची बैठक आयोजित करण्यात आली.
नेरच्या ४ तलाठ्यांचे निलंबन; वणीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?
बैठकीत गजाननची आई मलाबाई अंबाडेरे आणि नातेवाईक नागोसे यांनी गजानन बेपत्ता असल्याचे सांगितले. मात्र एवढे दिवस उलटूनही त्याबाबत पोलिसांत तक्रार का करण्यात आली नाही, असा प्रश्न वधूपक्षाने उपस्थित केला. त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. वराच्या बेपत्ता होण्यामागे काहीतरी वेगळे कारण असल्याचा संशय वधूपक्षाला आला. सोन्याच्या दागिन्यांची मागणी पूर्ण न झाल्याने संगनमताने वराला लपवून विवाह मोडण्यात आल्याचा आरोप करत मुलीच्या वडिलांनी 3 जून 2026 रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गजानन गणेश अंबाडेरे, मलाबाई गणेश अंबाडेरे, नागोसे (पूर्ण नाव अज्ञात), रा. मेंढला, ता. कळंब, जिल्हा यवतमाळ तसेच मनीषा विठ्ठल वाघाडे आणि विठ्ठल वाघाडे यांच्याविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम 1961चे कलम 4 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, साक्षगंधापर्यंत पोहोचलेले लग्न अचानक मोडल्याने तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला असून परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.











