वणी टाईम्स न्युज | वणी येथील 220 केव्ही उपकेंद्र येथे अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करून महत्त्वाचे कॉपर अर्थिंग रॉड चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एकूण ९ नग कॉपर रॉड चोरीला गेले असून सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता नियमित पाहणी दरम्यान सुरक्षा रक्षकांना 220 केव्ही पांढरकवडा, चंद्रपूर आणि वरोरा या तिन्ही लाईनवरील आयसोलेटरला जोडलेले कॉपर रॉड गायब असल्याचे आढळून आले. याची माहिती तात्काळ पाळी प्रमुखांकडे देण्यात आली.
यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उपकेंद्र परिसराची तपासणी केली असता, तारांचे कुंपण कापून अज्ञात व्यक्तींनी आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी योजनाबद्ध पद्धतीने तिन्ही लाईनमधील कॉपर अर्थिंग रॉड काढून नेल्याचे निदर्शनास आले.
महसूलची तत्परता? रेती चोरट्याविरुद्ध 6 महिन्यानंतर पोलिसात तक्रार !
या संदर्भात उपकार्यकारी अभियंता विनोद शेंडे यांनी पोलीस स्टेशन वणी येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत, चोरीच्या वेळी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांकडून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम कलम 135, 136 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.










