वणी टाईम्स न्युज : रस्त्यावर वळण घेत असताना समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाला साईड देण्यावरून झालेल्या वादातून स्कॉर्पिओ मधील चौघांनी कार चालकावर हातोडीने हल्ला करुन जखमी केले. हल्लेखोरांनी कारचे ड्रायव्हर साईडचे दाराचा काचही हातोडीने फोडून कारचा नुकसान केलं. सदर घटना वणी येथील जैताई मंदिराजवळ रविवार 1 जून रोजी सायंकाळी 7.45 वाजता घडली.
फिर्यादी मनोज प्रभाकर ढुंमे (52) रा. नरेंद्र नगर नागपूर यांनी घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार फिर्यादी कायर येथील त्यांचे शेताची पाहणी करून फियाट पुंटो क्रमांक MH29AD6417 गाडीने परत वणीला येत होता. जैताई मंदिर परिसरात डॉ. अलोणे यांच्या घराकडे वळण घेत असताना समोरुन MH29 BV9798 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी आली. फिर्यादी यांनी आपली कार साईडला करून स्कॉर्पिओ चालकाला निघून जाण्याचा इशारा केला. मात्र स्कॉर्पिओ निघत नसल्याने फिर्यादी यांनी आपल्या कारमधून खाली उतरून त्यांना जाण्यासाठी सांगितले.
तेव्हा स्कॉर्पिओ गाडीतून चार इसम खाली उतरले व फिर्यादीला शिवीगाळ करत मारण्यासाठी धावून आले. त्यातील एका व्यक्तिने अश्लील शिवी देत ‘ हमारे को पहचानता नही क्या ? निकल यहां से। मेरा नाम उमेश राय है, मेरे से पंगा मत लेना वरना जान से मार दूंगा… अस म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नव्हे तर एका जणांनी स्कॉर्पिओ मधून लोखंडी हातोडा काढून फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. मात्र फिर्यादी यांनी हात आडवा करून वार चुकवला. त्यावर त्यांनी हातोड्याने पुंटो कारच्या ड्रायव्हर साईडचा काच फोडला व जीवे मारण्याची धमकी देऊन स्कॉर्पिओ गाडीत बसून पळून गेले.
घटनेबाबत फिर्यादी मनोज प्रभाकर ढुमे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उमेश राय, रा. वणी व त्याचे इतर 3 साथीदारांवर कलम 352, 351(3), 351(2), 324(4), 3(5), 118(1), 115(2) BNS अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.










