वणी टाईम्स न्युज: बहिणीला शिवीगाळ का केली ? या कारणावरून सुनेच्या भावाने सासू, सासरे व दिराला मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री 3 वाजता रासा गावात घडली. या प्रकरणी फिर्यादी प्रकाश मारोती शिंदे (50) रा. रासा यांनी वणी पोलिसात दिलेल्या फिर्यादवरून वरोरा येथील चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना दोन मुलं असून मोठा मुलगा शुभम तिच्या पत्नीसह वेगळा राहतो. तर लहान मुलगा उमेश हा त्यांच्या बरोबर राहत आहे. शुभम आणि त्याची पत्नी रोशनीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. याच कारणावरून रोशनी हिच्या माहेरकडील लोकांबरोबरही शिंदे कुटुंबाचे पटत नव्हते.
2 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास रोशनी हिचा भाऊ मोहन केशव कुचनकर (30), रा. वरोरा, जि. चंद्रपूर हा दोन-तीन मित्रांसह शिंदे यांच्या घरासमोर आला. त्यावेळी त्याने “माझ्या बहिणीला शिवीगाळ का केली?” या कारणावरून गोंधळ घालत प्रकाश शिंदे यांच्या पत्नी गंगुबाई यांना लाकडी काठीने मारहाण केली. दरम्यान, सुटका करण्यास गेलेले प्रकाश शिंदे व त्यांचा मुलगा उमेश यांनाही मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत प्रकाश शिंदे यांच्या खांद्यावर व हातावर जखमा झाल्या, गंगुबाई यांच्या पायाला मार बसला तर उमेशच्या डोक्यावरही गंभीर दुखापत झाली. शिवाय आरोपींनी शिवीगाळ करत पुन्हा जीवघेणी धमकी दिली. या घटनेनंतर प्रकाश शिंदे यांनी वणी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मोहन केशव कुचनकर, रा. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व 3 अनोळखी आरोपी विरुद्ध कलम 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.










