वणी टाईम्स न्युज : वाहनाला साईड देण्याच्या वादावरून कार चालकावर चक्क लोखंडी हातोड्याने हल्ला करुन जखमी करणाऱ्या कुख्यात उमेश राय याला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी उमेश राय याला बुधवार 18 जून रोजी रात्री अटक केली. रात्र भर पोलीस लॉकअप मध्ये ठेवून आरोपीला आज गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 1 जून 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान येथील जैताई मंदिराजवळ आरोपी उमेश राय व त्याच्या मित्राने त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनाला साईड देण्यावरून एका व्यक्तीवर लोखंडी हातोड्याने हल्ला करुन जखमी केले. तसेच कारचा काच ही फोडला होता. फिर्यादी मनोज प्रभाकर ढुमे (52) रा. नरेंद्र नगर नागपूर यांनी घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
घटनेच्या 17 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी उमेश रायला अटक करून पोलिस कोठडीत डांबले. आरोपीवर इतरही अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या विरुद्ध तडीपारची कार्यवाही प्रस्तावित असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.










