वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्राम पंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिलावर सही मारण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच मागितल्याची कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून अँटी करप्शन विभागाने शनिवार 1 नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी नंतर सरपंच कु. सुचिता फुलू कुमरे (36) हिला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे शासकीय इमारती, रस्ते, ड्रेनेज आदी कामांचे ठेकेदार असून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरगाव (ता. मारेगाव) येथील संरक्षणभिंत बांधकामाचे काम पूर्ण केले होते. या कामाच्या बिलावरील चेकवर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच सुचिता कुमरे यांनी ८०,००० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीनुसार १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली असता, आरोपी सरपंच यांनी प्रत्यक्ष लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी सुचिता कुमरे यांना ताब्यात घेऊन मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप (अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे, व पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि त्यांचा पथक — पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, जयंत ब्राम्हणकर, संजय भुजाडे, पोना सचिन भोयर, मपोशि सरिता राठोड व चालक पोना अतुल नागमोते यांनी पार पाडली.
शासकीय सेवकांकडून लाच मागणी केल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो, यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधावा — दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२, मोबाईल ८९७५७९१०६४ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.










