वणी टाईम्स न्युज | वणी येथील सुप्रसिद्ध रंगनाथ स्वामी यात्रा 2026 संदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नसून सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचा खुलासा नगरपरिषद वणीने तर्फे करण्यात आला आहे. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘घोळ’ संबंधीच्या बातम्या वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत सोमवार 23 मार्च रोजी नगराध्यक्ष यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष विद्या आत्राम व उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

नगरपरिषदेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही ३७ दिवसांच्या कालावधीसाठी यात्रा आयोजित करण्यात येत आहे. यासाठी मनोरंजन पार्क, दुकाने व स्टॉल लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या निविदेला एकही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पुन्हा जाहिरात देण्यात आली. दरम्यान, निविदेतील अटींमध्ये बदल करून शुद्धीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या तीन निविदांपैकी एक निविदाधारक अपात्र ठरला, तर उर्वरित दोन निविदांमधील दर किमान अपेक्षित रकमेपेक्षा कमी असल्याने त्यांना नकार देण्यात आला. त्यानंतर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली, मात्र त्यातही प्राप्त दर समाधानकारक नसल्याने प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
चौथ्या टप्प्यात ११ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या निविदेत आनंद पुंजाराम भेले (यवतमाळ) यांनी ७.५० लाख रुपयांचा उच्चतम दर सादर केला. हा दर मागील सर्व निविदांपेक्षा जास्त असल्याने तसेच यात्रेचा कालावधी कमी होत असल्यामुळे सदर निविदेला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आल्याचे नगरपरिषदने स्पष्ट केले.
दरम्यान, मोहम्मद अर्शद भाटी (नागपूर) यांनी दूरध्वनीवर अधिक रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्यांनी त्यासंदर्भात कोणतेही लिखित पत्र दिले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच त्यांनी निविदा प्रक्रियेनुसार आवश्यक रक्कमही जमा केली नसल्याने त्यांचा दावा ग्राह्य धरता आला नाही.
नगरपरिषदने पुढे म्हटले आहे की, संबंधित व्यक्तीने कोणतीही औपचारिक पूर्तता न करता यात्रा मैदानावर साहित्य ठेवले होते. प्रशासनाच्या सूचनेनंतरही त्यांनी नियमांचे पालन केले नाही. यानंतर काही लोकप्रतिनिधींच्या मदतीने खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रसिद्धीपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की, सर्व निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली असून संबंधित कागदपत्रे नगरपरिषदेत उपलब्ध आहेत. कोणतीही शहानिशा न करता चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
शेवटी, नगरपरिषद वणीने पत्रकारांना आवाहन केले आहे की, वस्तुस्थितीची खातरजमा करूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात आणि जनतेसमोर सत्य माहिती मांडावी. पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुगेवार, आरोग्य सभापती अनिल चिंडालिया, बांधकाम सभापती लवली लाल, रवी बेलुरकर यांचेसह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.










