वणी टाईम्स न्युज : कॉलेज सुटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी बस स्टॉप कडे पायदळ जात असलेल्या 3 विद्यार्थिनीला मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात दोन विद्यार्थींना किरकोळ मार लागला तर एका विद्यार्थिनीच्या डोक्याला, पायाला व कंबरेला जास्त मार असल्यामुळे उपचारासाठी नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना मारेगाव येथे रंगनाथ बँकेसमोर 19 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली.
फिर्यादी विद्यार्थिनी सलोनी रुद्रेश्वर तुरविले हिने दिलेल्या तक्रारीनुसार कॉलेज सुटल्यानंतर ती तिच्या मैत्रीण दिव्या व रुतिका सोबत बस स्टॉपकडे रस्त्याच्या डाव्या बाजूने पायदळ जात होती. दरम्यान रंगनाथ बँकेजवळ मागून आलेल्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH29 BW 8146 च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून तिन्ही विद्यार्थिनीला मागून ठोस मारुन जखमी केले.
या अपघातात सलोनी व दिव्याणी हिला किरकोळ मार लागली असून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन सुट्टी देण्यात आली. तर तिसरी विद्यार्थिनी निकिता चंद्रशेखर कोंडेकर (20) रा. कोठोडा, ता. केळापूर हिच्या डोक्याला, उजव्या पायाला तसेच कंबरेला जास्त मार असल्याने तिला उमरी येथील क्रिश्चन दवाखान्यात उपचार करून नागपूर येथे रेफर करण्यात आले.
ठोस मारल्यानंतर बाईक चालक हा बाईक सोडून पसार झाला होता. सदर बाईक हा किशोर कवडू घागी (23) रा. घोडदरा ता. मारेगाव चालवीत असल्याची माहितीवरून त्याचे विरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात कलम 281, 125(a), 125 (b) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











