वणी टाईम्स न्युज : समोर जात असलेल्या ट्रॅक्टरने अचानक वळण घेतल्याने मागून येणाऱ्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. वणी घोंसा मार्गावर सुकणेगाव टर्निंग जवळ 16 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता हा अपघात घडला. गणेश मारोती बोबडे (38), रा. कोरंबी (मारेगाव) असे जखमीचे नाव आहे. अपघातानंतर जखमीला वणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे रेफर करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार,कोरंबी मारेगाव येथील गणेश बोबडे हे पल्सर मोटरसायकल क्र. MH29-AP1758 वर वणीहून कोरंबीच्या दिशेने जात होता. दरम्यान, सुकनेगाव मोडजवळ ट्रॉली (क्र. MH29-V-6303) असलेल्या ट्रॅक्टरने रॉंगसाईडने अचानक वळण घेतल्यामुळे ट्रॅक्टरच्या मागील चाकाचा धक्का दुचाकीला बसला. त्यामुळे गणेश हा दुचाकीसह रस्त्यावर कोसळला व त्याच्या कंबरेला, उजव्या हाताला आणि मूत्राशयास गंभीर दुखापत झाली.
अपघाताच्या घटनेबाबत जखमीचे भाऊ निलेश मारोती बोबडे यांनी 1 मे 2025 रोजी वणी पोलीस स्टेशनला संबंधित ट्रॅक्टर चालक गौरव यशवंत पिंगे रा. मारेगाव (कोरंबी)ता. वणी याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी घटनेचा तपास सुरू केला असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर चालकाविरोधात कलम 281, 125 (b) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










