वणी टाईम्स न्युज : गावात स्थलांतर करून मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या एका दलित (महार-बौद्ध) दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ, गावातून हाकलून लावण्याची धमकी तसेच रोजगार नाकारण्याचा प्रकार उघड झाला असून, पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी भाजपचे वणी तालुका सरचिटणीस मनोज ऊर्फ मंजु भाऊराव डंभारे, रा. नीलजई, तालुका वणी विरुद्ध शिरपूर ठाण्यात अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी साधना प्रशांत नगराळे (37) रा. नीलजई, तालुका वणी यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या पतीसह निलजई येथे भाड्याच्या घरात राहत असून किरकोळ दुकान व मजुरीवर संसार चालवत आहेत. आरोपी मनोज ऊर्फ मंजु भाऊराव डंभारे (48) हा स्वतःला भाजपचा पदाधिकारी असल्याचा ताव आणून नगराळे दांपत्याला वारंवार जातीवाचक शिवीगाळ तसेच रोजगार करण्यास मज्जाव करीत आहे.
📌 प्रकरणाचा तपशील
दिनांक 30 ऑगस्ट रोजी ग्रामसभेनंतर आरोपी डंभारे यांनी फिर्यादीच्या घरासमोर उभे राहून, सार्वजनिकरित्या जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी पीडित दाम्पत्य रोजगार मिळविण्यासाठी जीआरएन कंपनीच्या कार्यालयात गेले असता, आरोपी डंभारे यांनी थेट अधिकाऱ्यांना धमकावत, “हे लोक येथे दिसले नाही पाहिजेत, कामावर घेतले तर कंपनी बंद पाडीन” असे जाहीरपणे सांगितले. या प्रकारामुळे पीडित कुटुंबाच्या रोजगारावर गदा आली असून उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे. शिवाय सततच्या धमक्यांमुळे जीविताला धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे
फिर्यादी हिने शिरपूर पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(r), 3 (1) (s) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील तपास सुरू केला असल्याचे समजते.










